Sunday, 13 January 2019

अपेक्षा



 नमस्कार,

                हा लेख थोडासा मोठा आहे पण महत्त्वाचा आहे. खास करून लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या आई- वडिलांसाठी.
                व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर सध्या एक मेसेज बराच वाचायला भेटतो आहे की कशाप्रकारे मुलींच्या/ त्यांच्या आई-वडिलांच्या मुलाकडूनच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलीच्या आई वडिलांना कसा गलेलठ्ठ पगार, शहरात स्वतःच घर आणि गाडी असणारा मुलगा हवा आहे.
                खरंतर काही प्रमाणात या अपेक्षांबद्दलचा आक्षेप बरोबरही आहे. त्यामुळे या विषयावर बोलावं असं कधी वाटलं नव्हतं. पण या काही दिवसात मित्रांशी झालेल्या चर्चेत प्रकर्षाने जाणवलं की बऱ्याच मुलांना, त्यांच्या आई- वडिलांना या अपेक्षा अगदीच फाजील आहेत अस वाटतं. आणि त्याचं वेळी त्यांच्या मुलीकडून असलेल्या अपेक्षा - त्याच्या बद्दल मात्र कोणी साधा फेरविचार करण्याचा विचार ही करत नाही. त्यामुळं वाटलं की थोडंस बोललं पाहिजे.
                 जर लक्ष देऊन पाहिलं- तर मुलाचा स्वतःचा फ्लॅट हवा, रग्गड पगार हवी या अपेक्षा उच्चशिक्षित मुलीच्या आई-वडिलांकडूनच ऐकायला भेटतात. आणि खरं पाहता त्यात काहीही चुकीचं नाही. आता मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना प्रश्न पडला असेल की, 'असं का ? ' तर तेच मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. 
(१)
                आपल्या मुलाचं उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलाच्या आई-वडिलांनी कितीतरी कष्ट घेतलेले असतात, मुलाच्या शिक्षणासाठी आपली कितीतरी स्वप्न त्यांनी कोणाच्याही नकळत दाबून टाकलेली असतात, त्यांच्या भवितव्यासाठी स्वतःवर कर्जाचे डोंगर चढवून घेतलेले असतात. त्यांच्या या मेहनतीला आणि त्यागाला कोणीही नाकारू शकत नाही. आणि आपण जेव्हा आपल्या मुलासाठी मुलगी पाहतो, तेव्हा ती त्याच्या इतकीच सुशिक्षित किंबहुना त्याचाच क्षेत्रातली पाहतो हे ही तितकच खरं. नाही का ?
                 म्हणजेच मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या आई-वडिलांनी जितकी मेहनत घेतली आहे, तितकीच मुलीच्या आईवडिलांनीही घेतलेली असते हेही आपल्याला मान्य करायला हवं !
                  तसं तर आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले ते मुलांच्या भवितव्यासाठी असतात. तरीपण मुलाच्या आई-वडिलांनी घेतलेले कष्ट आणि मुलीच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट यात फरक मात्र नेहमीच राहतो. आणि तो म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी घेतलेले कष्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या उतारवयासाठी केलेली गुंतवणूक असते. तर मग मुलीच्या आईवडिलांनी कशासाठी घेतलेले असतात हे कष्ट ? ती थोडीच देऊ शकणार असते मुला इतका आधार त्यांना आणि कुटुंबाला ? तरीपण का घेतात ते इतकी मेहनत ? 
ते इतकी मेहनत घेतात, ती फक्त आणि फक्त मुलींच्या भवितव्यासाठी. आणि मग तिच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी त्यांच्या अपेक्षा ठेवल्या तर चुकलं कुठे !
                  आणि समाजात मुलीचं शिक्षण मुलाच्या बरोबरीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी असलं, तरीही मुलीच्या वडिलांना हुंडा द्यावा लागला नाही हे कधीतरीच पाहायला भेटत. जर मग मुलीच्या आई - वडीला कडून आपल्या इतक्या अपेक्षा आहेत, तर त्यांनी त्यांच्या अपेक्षा थोड्या जास्त ठेवल्या तर बिघडतं कुठे ? 
                  कित्येक वेळेस मी पाहिलं आहे की आपण मागितलेल्या भरभक्कम हुंड्याची पाठराखण करण्यासाठी मुलाचे आई-वडील सहज म्हणतात की, ' ही तर मुलाच्या शिक्षणावर खर्च झालेली रक्कम आहे फक्त '. आणि पाहायला गेलं तर मुलीची कमाईपण अप्रत्यक्षपणे मुलाच्या कुटुंबाच्याच कामी येणार असते, तर मग मुलीच्या शिक्षणाचा खर्च कोणी कोणाला द्यावा ? कोणाच्या अपेक्षा बदलायला हव्यात ?
(२)
                  उच्चशिक्षित, शहरात नोकरी करणाऱ्या मुलांसाठी जेव्हा मुलगी पाहिली जाते, तेव्हा ती सहसा तेवढीच सुशिक्षित आणि नोकरदार पाहिली जाते. आणि त्या मुलीकडून तेवढ्यात अपेक्षा ठेवल्या जातात, ज्या कित्येक वर्षापूर्वी 'चूल आणि मूल' सांभाळणाऱ्या स्त्रीकडून केल्या जायच्या. आजही मुलगी पहायला गेल्यानंतर तिला 'स्वयंपाक येतो का, घर काम येतं का ?' हे प्रश्न विचारले जातातच ( या बद्दल माझा आक्षेप नाही ) जी मुलगी मुला इतकाच वेळ ऑफिसमध्ये राबत असते, मुला इतकाच प्रवासाचा त्रास तिलाही सहन करावा लागतो तरीही आपली अपेक्षा असते की तिने घरी आल्यानंतर स्वयंपाक करावा घरातली इतर कामं करावीत. मग जर मुलीकडून आपल्या अपेक्षा इतक्या असतील, तर तिने / तिच्या आईवडिलांनी मुलाकडून थोड्या जास्त अपेक्षा ठेवल्या तर चुकतं कुठे ?
(३)
( हा मुद्दा समजून घ्या कृपया गैरसमज करून घेऊ नये ) 
                प्रत्येक मुलीकडून ही अपेक्षा केली जाते की तिने मुलाच्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे,एकत्र कुटुंब सांभाळलं पाहिजे (आणि खरंच हे गरजेचे आहे ). पण त्याच वेळी हा प्रश्न कधी विचारला जातो का की, 'मुलीच्या आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी मुलगा तयार आहे का आणि कितपत तयार आहे ?'
रिती आणि रुढींच्या पलीकडे जाऊन कुटुंब आणि जिव्हाळा या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं, तर नक्कीच या प्रश्नातला योग्य अर्थ सापडेल. ( या विषयावर मी '... तिला भाऊ नाही'  http://ishshri.blogspot.com/2017/07/blog-post_29.html?m=1
या लेखात माझं सविस्तर मत मांडलं आहे )
(४)
                काही समाजात आता एक नवीन प्रथा सुरू झाली आहे की मुलाच्या घरच्यांच्या ऐवजी आता मुलीच्या घरच्यांना हुंडा दिला जातो. माझ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रथा नाही, नवीन व्यवहार सुरू झाला आहे. कमी झालेली मुलींची संख्या बघता, आपला मुलगा अविवाहित राहू नये म्हणून मुलाच्या घरच्यांनी केलेला समंजस व्यवहार. ( नशीब आपल्याकडे आणखीन ती वेळ आलेली नाही. सध्या फक्त अपेक्षाच वाढल्या आहेत )
                 जर्रा काझी सरांनी ऐकवलेल्या या ओळी मुलीच्या वडिलांची स्थिती सहज सांगून जातात- 
उस बाप कि, 
मुठ्ठी मे जान होती है
जिसकी - 
बेटी जवान होती है
                'मुलींची संख्या कमी का ?' याबद्दल मी काही बोलणार नाही. पण 'का' ते तुम्ही जाणता. तर मग ज्या कारणांमुळे, काळजीमुळे, भीतीमुळे आज समाजात मुलींची संख्या कमी आहे त्या कारणांना, काळजीला आणि भीतीला हिंमतीने सामोरे जात ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला घडवलं, फुलवलं, मुलांच्या बरोबरीने केलं त्यांनी आपल्या धैर्या बद्दल, साहसाबद्दल थोड्या जास्त अपेक्षा ठेवल्या, तर बिघडलं काय!
आणि शेवटी - मला काय म्हणायचं आहे ? 
                 अपेक्षा कोणाच्या चुकत आहेत याचा विचार आणि दोष- आरोप करण्यापेक्षा, आपण आपल्या अपेक्षा कितपत योग्य आहेत याचा विचार आणि त्यात योग्य बदल करू शकलो तर ...
                  जस मुलीच्या आईवडिलांनी मुलाकडून स्वतःचं घर, मोठ्या पगाराची अपेक्षा करणं चुकीचं आहे, तसंच मुलाने / मुलाच्या आईवडिलांनी मुला इतकंच शिक्षण झालेल्या, नोकरदार मुलीची अपेक्षा करणं, हे पण चुकीचं नाही का ?
( तसं बऱ्याच मुलांना वाटतं की मुलींचे आई-वडील हल्ली फक्त मुलांचा पैसा पाहून लग्न ठरवून टाकतात. तर मित्रांनो, लक्षात घ्या 'हा शुद्ध भ्रम आहे'.
                 अहो, अंगणातल्या वेलीवर उमललेले एखाद फूल, ते सुद्धा आपल्याला देव्हाऱ्यातच वाहायच असतं ! मग हे तर आयुष्याच्या वेलीवर उमललेलं, श्वासाश्वासाने जपलेलं काळजाच फुल. त्याचा देवारा निवडताना किती विचार केला जात असेल ? )

                  तसं मुलीबद्दलच्या अपेक्षेबद्दल म्हणाल तर फक्त मुलाच्या बरोबरीची मुलगी या अपेक्षेपेक्षा आपल्या कौटुंबिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि आर्थिक परिघात सहज सामावू शकेल अशा मुलीची अपेक्षा करणे योग्य आणि व्यावहारिक राहणार नाही का ! शेवटी दोन्ही बाजूंसाठी गरजेचं आहे, ते आपल्या विचारांची, नैतिक मूल्यांशी साम्य ठेवणार नवीन नातं गुंफण. दोन्ही बाजूंनी इतरांच्या अपेक्षाच गणितं मांडण्यापेक्षा, आपल्याच अपेक्षा हिशोबात ठेवल्या तर - शोधचं काय पण संसार सुद्धा दृष्ट लागण्याजोगा होईल, नाही का ?
                     विचार आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. कारण मुलीचा बाप म्हणजे चंदनाचे झाडचं ! ज्या गंधाला तो आयुष्यभर आपल्या काळजात घडवतो, फुलवतो, बहरवतो तोच गंध अचानक कोणीतरी घेऊन जातो. आणि मागे ठेवून जातो -  ते फक्त एक रितेपण, आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीच न भरून येणारे रितेपण ! 
आपल्या रीती परंपरेनुसार मुलीच्या आईवडिलांसाठी हे रितेपण अटळच, तरी या रितेपणातला त्यांचा त्रास कमी व्हावा - इतके प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतोत ☺️
--- ईशश्री #ishshri ( दिगंबर वाघमारे ) ---

No comments:

आईपण

मित्रांनो, आईबद्दल कृतज्ञता आणि प्रेम तस प्रत्येक मनात असतंच. त्यामुळं या कवितेत मी आईपणाची मी एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अशी...